"राहुलने प्रियांका गांधींना असं 'किस' करणं ही भारतीय संस्कृती नाही"; योगी सरकारमधील मंत्र्याचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:17 PM2023-01-10T21:17:59+5:302023-01-10T21:19:48+5:30
एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले दिनेश प्रताप सिंह यांनी गांधी कुटुंबावर टीका केली आहे.
लखनौ-
एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले दिनेश प्रताप सिंह यांनी गांधी कुटुंबावर टीका केली आहे. सध्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणारे रायबरेलीचे दिनेश प्रताप सिंग यांनी कोणत्याही इंग्रजाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी राहुल आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केलं आहे.
"इंग्रजांशी आपल्या पूर्वजांची लढा दिला. मोठा लढा दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. मग आता पुन्हा इंग्रजांना आपल्यावर राज्य करू देणार आहात का? इंग्रजांनी इथं यावं फिरावं, पर्यटन करावं आणि मायदेशी परतावं. आज कोणताही इंग्रज इथं येऊन राजकारण करु शकत नाही. गांधी परिवार देखील इंग्रज आहे", असं दिनेश प्रताप सिंह म्हणाले.
"राहुल गांधींना भारतीय संस्कृती समजणार नाही. कुणी आपल्या बहिणीला अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी किस करतं का? हे खूप लज्जास्पद आहे. कोणता भारतीय व्यक्ती अशापद्धतीनं किस करतो? टी-शर्ट परिधान करुन भारत जोडो यात्रा करताहेत. जरा आपल्या पूर्वजांकडून काहीतरी शिका", असंही दिनेश प्रताप सिंह म्हणाले.
आपले पूर्वज टी-शर्ट नव्हे, तर धोतर आणि कुर्ता परिधान करुन यात्रेला जायचे. जरा भारतीय संस्कृती समजून घ्या. जे राहुल गांधी रायबरेली आणि अमेठीमधील आपलं वर्चस्व वाचवू शकले नाहीत. ते भारताला काय जोडणार आहेत? भाजपाला भारत जोडो यात्रेबाबत चिंता करण्याचं काहीच कारण नाही, असंही दिनेश सिंह म्हणाले.
राहुल आणि गांधी कुटुंबीय आजही इंग्रजांच्या संस्कृतीचं पालन करत आहेत. जगासमोर भारताचं नाव खराब करत आहेत. तसंच ज्यांना संत आणि पुजारीमधील फरक कळत नाही त्यांनी आरएसएसला कौरव वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडू नये, असंही ते म्हणाले.