'अध्यक्ष महोदय, मी दुखावला गेलोय; राहुल गांधींना शाळेत पाठवण्यात यावं'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:08 PM2021-03-09T14:08:30+5:302021-03-09T14:10:23+5:30
लोकसभेत मंत्री गिरीराज सिंह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका
नवी दिल्ली: मत्स्यपालनासाठी वेगळं मंत्रालय तयार करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींवर भारतीय जनता पक्षानं हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेत राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल यांना माहिती मिळावी, राहुल यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी राहुल यांना शाळेत पाठवण्याची गरज असल्याचा टोला सिंह यांनी लगावला. (BJP Minister Giriraj Singh slams Congress Leader Rahul Gandhi)
राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही तर 'या' राज्याची इच्छा; सर्व्हेत मोदींना टाकलं मागे
मत्स्यपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबद्दल लोकसभेत भाजपच्या खासदार सुनिता दुग्गल भाषण करत होत्या. या विषयावर बोलताना मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. 'राहुल यांनी २ फेब्रुवारीलाच लोकसभेत मत्स्यपालन विभागाबद्दल प्रश्न विचारला होता. पण काही दिवसांतच असा विभाग देशात असल्याचा त्यांना विसर पडला,' असं गिरीराज सिंह म्हणाले.
राहुल गांधीच्या विधानावरून गिरीराज सिंह यांनी लोकसभेत जोरदार टोलेबाजी केली. 'राहुल गांधींच्या स्मरणशक्तीला काय झालंय मला समजत नाही. २ फेब्रुवारीला त्यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. पण पुद्दुचेरी आणि कोचीला गेल्यावर त्यांना याचा विसर पडला. मत्स्य पालन विभाग आधीपासूनच कार्यरत असल्याचं ते विसरले. आमचं सरकार आल्यावर यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू, असं राहुल गांधी म्हणाले. याबद्दल मला दु:ख वाटतं,' असं सिंह यांनी म्हटलं.