एटा – उत्तर प्रदेश सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता(Mahesh Gupta) यांनी गुरुवारी मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. देशात जोपर्यंत कोरोना महामारी (Coronavirus) नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्न सेवन करणार नाही असं मंत्री महेश गुप्ता म्हणाले आहेत. इतकचं नाही तर मागील ५ वर्षापासून अन्न सेवन न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महेश गुप्ता म्हणाले की, भारतात दहशतवादाचा अंत व्हावा यासाठी मी तपस्या केली होती. जोवर दहशतवाद नष्ट होत नाही तोपर्यंत अन्न सेवन करणार नाही. त्यामुळेच आज भारतात दहशतवाद अखेरच्या घटका मोजत आहे. दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे. नरेंद्र मोदी हे केवळ राष्ट्रनायक नाहीत विश्वनायक आहेत. परदेशी जमिनीवरही पंतप्रधान मोदींचा जादू चालला आहे. ब्राझीलला कोरोना काळात औषध पोहचवून त्यांनी संजीवनी दिली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत अमेरिकाही पंतप्रधान मोदींच्या धोरणावर खुश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याचा दौरा केला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी राज्यातील जनतेच्या रक्षणासाठी सर्वकाही पणाला लावले. आज योगींच्या तपस्येमुळेच उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सावरून निघाला. कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी उत्तर प्रदेश पूर्णपणे सज्ज आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळे वार्ड तयार करण्यात आले आहेत. सर्व उपयोगी मशिनरी आणल्या आहेत अशी माहितीही महेश गुप्ता यांनी दिली.
भारतासह जगात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
भारतासह संपूर्ण जगातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढली आहे. भारतात रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्या जवळपास आहे. तर, जगात गेल्या आठवड्यात कोरोनाचे ३४ लाख नवे रुग्ण समोर आले. जागतिक आरोग्य संखटनेने म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात ३.४ मिलियनहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रनांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ५७००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता