रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. रस्ते अपघातांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. यासोबतच गडकरींनी कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दलही सांगितले. भारतीय बाजारपेठेतही सहा एअरबॅग्स असलेली वाहने बाजारात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सीट बेल्ट न लावणे हेही चुकीचे असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
आजतकशी संवाद साधताना गडकरींना सायरस मिस्त्री यांच्या निधनाबाबात प्रश्न विचारण्यात आला. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री यांना आपला जीव गमवावा लागला. “अहमदाबाद-मुंबई महामार्ग अत्यंत धोकादायक आहे. तिथे ट्रॅफिक PCU 1.20 लाख आहे, जे खूप आहे. ते 20 हजार पीसीयूपर्यंत खाली आणावे लागेल,” असे गडकरी म्हणाले. “2024 पर्यंत सरकारला रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करायचे आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल,” असेही ते म्हणाले.
“कार कंपन्या इतर देशांना वाहने निर्यात करतात तेव्हा त्या सहा एअरबॅग्ज ठेवतात. परंतु भारतात चार चार एअरबॅग्ससह कार्सची विक्री होते. भारतीयांच्या जीवाची काही किंमत नाही का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. यावेळी त्यांना सहा एअरबॅग्ज बसवल्यास कारची किंमत 50-60 हजार रुपयांनी वाढू शकते असा सवालही करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले. मोठ्या प्रमाणात उत्पादन असेल तर एका एअरबॅगची किंमत फक्त 900 रुपये असेल, असेही गडकरींनी स्पष्ट केले.
तरूण वयात तोडले नियमतरूण वयात आपणही नियम तोडले. परंतु हे किती धोकादायक ठरू शकते याचा त्यावेळी अंदाज नव्हता. कॉलेजमध्ये असताना निवडणुकांच्या वेळी एका स्कूटरवर चार जण बसून फिरत होतो आणि दंड होऊ नये म्हणून हाताच्या मदतीनं नंबर प्लेट लपवत होतो. परंतु आता लोकांना आपले विचार बदलावे लागतील. नियमांचं पालन करावं लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.