पाटणा :पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाई वाढत चालली असताना सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. घाऊक बाजारातील महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. अशातच बिहारमधील एका मंत्र्याने अजब विधान केले आहे. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही, या सगळ्याची सवय होते, असा दावा मंत्रिमहोदयांनी केला आहे. (minister in nitish cabinet gave controversial statement over price hike of petrol and diesel)
बिहारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद (Narayan Prasad) यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि वाढती महागाई यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नारायण प्रसाद यांनी केलेल्या विधानानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
पेट्रोल, डिझेलचे दर नेमके कशामुळे पेटले?; जाणून घ्या ५ महत्त्वाच्या गोष्टी
महागाईचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होत नाही. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही. याची लोकांना आता सवय झाली आहे. सामान्य जनता गाडी घेऊन नाही, तर सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झालेली नाही, असा दावा नारायण प्रसाद यांनी यावेळी बोलताना केला.
महागाई वाढल्यामुळे बजेटवर काहीसा परिणाम जाणवतो. मात्र, हळूहळू सामान्य जनतेला याची सवय होते. महागाईला विरोध सामान्य जनता करत नसून, नेतेमंडळी करत आहेत, असा आरोप नारायण प्रसाद यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, गेले सलग अकरा दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे. इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीने ६५ डॉलरची पातळी ओलांडली आहे.