indian army : भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता आहे. खरं तर युद्ध प्रसंगी या दोन पदांवरचे अधिकारी सैनिकांचे नेतृत्व करत असतात. याशिवाय सुमारे १४ लाख जवानांसह लष्करात ६३० डॉक्टर, ७३ दंतचिकित्सक आणि ७०१ परिचारिकांची देखील कमतरता आहे. केंद्र सरकारने ही माहिती संसदेत दिली असून भारतीय नौदल आणि हवाई दलातही अधिकाऱ्यांची कमतरता आहे.
दरम्यान, नौदलात २,६१७ लेफ्टनंट कमांडर आणि छोट्या श्रेणीतील अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तसेच भारतीय हवाई दलाला ९४० फ्लाइट लेफ्टनंट आणि ८८१ स्क्वाड्रन लीडरची आवश्यकता आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सोमवारी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही बाब मांडली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मेजर आणि कॅप्टन पदावरील अधिकाऱ्यांच्या कमतरतेचे कारण कोरोना काळात न झालेली भरती असू शकते. सर्वच कॅडरमध्ये कमी प्रमाणात भरती झाली होती. भारतीय सैना, नौदल आणि वायु सेनेतील अधिकाऱ्यांच्या कमतरता भरून काढण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील प्रवेश अधिक सोयीस्कर आणि आकर्षित करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे आहे.
लष्करात अधिकाऱ्यांची कमतरता
भारतीय सेना | भारतीय वायुसेना | भारतीय नौदल |
२,०९९४ मेजर | ९४० फ्लाइड लेफ्टनंट | लेफ्टनंट कमांडर किंवा त्याहून कमी श्रेणीत असलेले २,१७६७ अधिकारी |
४,७३४ कॅप्टन | ८८१ स्क्वाड्रन लीडर | - |
वृत्तसंस्था 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैन्य दलात अधिकाऱ्यांची असलेली कमतरता ही चिंताजनक बाब आहे. सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानंतर अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली आहे. पण, तरीदेखील कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा तरुणांना याबद्दल कमी माहिती आहे. लष्करातील जीवन कठीण आणि धोकादायक मानले जाते, त्यामुळे स्वारस्य देखील कमी झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे पदोन्नतीच्या कमी शक्यता, मुलांच्या शिक्षणासह जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम करणाऱ्या वारंवार बदल्या. या सर्व कारणांमुळे तरुणांचा सैन्याविषयी भ्रमनिरास होत आहे. तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्करी अकादमींमध्ये पुरेशा क्षमतेचा अभाव हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.