भर बाजारात भाजपा मंत्र्यांनी महिलेच्या हाताने लगावून घेतली श्रीमुखात; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:24 PM2022-01-13T20:24:58+5:302022-01-13T20:59:51+5:30
शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. भाजी मार्केटमध्ये कारवाई केल्यानंतर येथील विक्रेत्यांनी मंत्र्याविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्यावरही महिलेने राग काढला. दुकान हटवण्यासाठी मारहाण केल्याचा आरोपही महिलेने यावेळी केला. शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंत्र्यांनी महिलेच्या हाताने स्वत:च्या श्रीमुखात लगावून घेतली आहे.
भाजी मार्केटमधील महिलेशी तोमर यांनी वेगळ्याच शैलीत संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, हजीरा येथील भाजी मार्केटमधील महिला बबीना यांचं दुकान हटविण्यात आलं होतं, हे भाजी मार्केट दुसऱ्या एका मैदानात शिफ्ट करण्यात आलं आहे. त्यावेळी येथील दुकानदारांनी संताप व्यक्त केला होता. बबीना यांनी देखील तोमर यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला आहे. या दुकानावरचं त्यांचं पोट चालतं. पण प्रशासनाने मारहाण करून ते हटल्याचं सांगितलं.
"मी तुझा मुलगा आहे, आधी तू मला मारून घे मग मी तुझं म्हणणं ऐकेन"
महिला नाराज झालेली पाहून "मी तुझा मुलगा आहे. आधी तू मला मारून घे मग मी तुझं म्हणणं ऐकेन" असं म्हणत मंत्र्यांनी महिलेचे हात घेऊन स्वत:च्या श्रीमुखात लगावून घेतली. यानंतर महिलेचा राग थोडा शांत झाला. त्यांनी महिलेला नमस्कार करत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली असून अनेकांनी या व्हिडीओमध्ये मंत्र्यांची डायलॉगबाजी सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.