ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - विविध घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तुरूंगाची हवा खात असतानाच दिल्ली सरकारमधील सार्वजनिक मंत्री सत्येंद्र जैन यांचीही ३३ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
आयकर विभागाने अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील एका मंत्र्यांची तब्बल ३३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त त्यांना धक्का दिल्याचे समजते. बेहिशोबी मालमत्ता विरोधी कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत कर अधिका-यांनी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मालमत्तैपैकी राजधानीतील १०० गुंठ्याहून अधिक जमीन तसेच अनेक कंपन्यांचे शेअर्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३३ कोटींच्या आसपास आहे. जैन यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम , परिवहन आणि आरोग्य खात्याचा पदभार आहे.
कर अधिका-यांनी जैन यांच्याशी संबंधित अनेक कंपन्यांवर छापे मारले. त्यांनी जप्त केलेल्या जमिनीची किंमत सुमारे १७ कोटी तर शेअर्स १६ कोटींच्या आसपास असल्याचे समजते. मात्र याच मालमत्तेचे बाजारातील मूल्य यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे समजते. याप्रकरणी जैन यांच्याशी संबंधित ४ कंपन्यांना २७ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये इंडो मेटलिमपेक्स, अकिंचन डेव्हलपर, प्रयास इन्फोसोल्यूशन आणि मंगलायतन प्रोजेक्ट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधून रोख रक्कम घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने नोंद करून शेअर घेतल्याचा आरोप जैन यांच्यावर ठेवण्यात आला आहे.