नवी दिल्ली - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खुली ऑफर दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये हरल्यामुळे पक्षाकडून अधीर रंजन चौधरींना दुर्लक्षित आणि अपमानित केले जात आहे. काँग्रेसच्या या वागणुकीमुळे अनेक लोक भाजपात सहभागी झालेत. जर अधीर रंजन चौधरी यांचा काँग्रेसमध्ये अपमान होत असेल तर त्यांनी काँग्रेस सोडावी, त्यांनी एनडीए किंवा माझ्या RPI पक्षात यावं असं आमंत्रण मी देतो असं सांगत रामदास आठवलेंनी चौधरींना ऑफर दिली आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधलाय. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ज्यादिवसापासून मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे अध्यक्ष बनलेत. त्यादिवसापासून पक्षाच्या घटनेनुसार सर्व पदे अस्थायी झालीत. माझेही पद अस्थायी झालं आहे. मी निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांसमोर माझं मत मांडले तेव्हा आवश्यकता भासल्यास मला बाहेर ठेवले जाईल असं मल्लिकार्जुन खरगे टीव्हीसमोर म्हणाले. खरगेंच्या या विधानाने मला दु:ख झाले. पश्चिम बंगालमध्ये निकाल काँग्रेससाठी चांगले राहिले नाहीत. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी माझं पद दुसऱ्याला दिलं जावं असं खरगेंना सांगितलं होतं असं चौधरींनी खुलासा केला.
त्याशिवाय AICC ने पश्चिम बंगालच्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्याची माहिती मला दिली. २ महत्त्वाचे प्रस्ताव पास करायचे आहेत असं सांगितले. ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली बोलावली गेली. बैठकीच्या वेळी मी पश्चिम बंगाल काँग्रेसचा अध्यक्ष होतो, मात्र बैठकीत गुलाम अली मीर यांनी माझा उल्लेख करत राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष असं म्हटलं तेव्हा मी आता राज्याचा प्रदेशाध्यक्ष नाही हे कळालं असल्याचं अधीर रंजन चौधरींनी सांगितले.
गुलाम अली मीर यांनी दिलं स्पष्टीकरण
राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे संबंध आणि विविध मुद्द्यांवर बैठक आयोजित केली होती. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. अधीर रंजन चौधरीही बैठकीला होते. तेव्हा सर्वांना माहिती व्हावं यासाठी मी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीनंतर अधीर रंजन यांनी राजीनामा दिला आहे, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीवर आपले विचार ठेवायला हवेत. चौधरी यांनी राजीनामा दिला त्यामुळे तेव्हापासून ते माजी प्रदेशाध्यक्ष झालेत असं काँग्रेस नेते गुलाम अली मीर यांनी सांगितले. तसेच त्यांचा राजीनामा स्वीकारला की नाही याची पुष्टी केवळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे कार्यालय करू शकते असेही त्यांनी म्हटलं.