नितीन अग्रवालनवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री गेल्या काही दिवसांत सामान्य नागरिकांप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून मंत्री जनभावना समजून घेण्यासाठी त्यांच्यात थेट सहभागी होत आहेत. याची सुरुवात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली. त्यानंतर सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नकवी हे मुंबईत सामान्य व्यक्तीसारखे माटुंगा येथील कॅफे म्हैसूर येथे डोसा खाण्याचा आनंद घेताना दिसले.
महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी आपापल्या मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत गेले होते. मोदी यांनी सगळ्या मंत्र्यांना जनतेत जाऊन त्यांचे मन समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. या आधी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे सामान्य माणसाप्रमाणे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतील सीजीएचएस डिस्पेंसरीत गेले होते. तेथे त्यांनी आपली बनावट ओळख सांगून आरोग्याच्या अडचणी सांगितल्या व उपचार करून घेतले. त्यानंतर या डॉक्टरला कर्तव्यनिष्ठेबद्दल मंत्रालयात मांडविया यांनी बोलावून प्रशंसा केली. स्मृती इराणी या आधी त्यांचा मतदारसंघ अमेठीत लस्सी पिताना दिसल्या होत्या. नुकत्याच मोदी सरकारमधील सगळ्या मंत्र्यांनी देशभर लोकांमध्ये जाऊन जनआशीर्वाद यात्रा काढली होती. देशभरात २४ हजार किलोमीटरचे अंतर कापून पक्षाने १४ दिवसांत पाच हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले, असा दावा भाजपने केला आहे.