हरीश गुप्तानवी दिल्ली : विनयभंगासह ११ फौजदारी खटल्यांना सामोरे जात असलेले निशिथ प्रामाणिक यांना मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे विरोधकांनी केलेला गदारोळ ताजा असतानाच प्रामाणिक यांना देण्यात आलेले मंत्रीपदाचे अधिकारही आता चर्चेचा विषय झाले आहेत. गृहमंत्रालयातील कार्य वाटपानुसार, राज्यमंत्री प्रामाणिक यांना चक्क दुसऱ्या राज्यमंत्र्यांमार्फत फायली मिळणार आहेत.
राज्यमंत्री हा कॅबिनेट मंत्र्यास ‘रिपोर्टिंग’ करीत असतो; पण प्रामाणिक यांच्याबाबतीत हा नियम मोडण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. विदित असावे की, प्रामाणिक यांचे नागरिकत्व संशयास्पद असल्यामुळेही संसदेत गदारोळ झाला होता. गृहमंत्री अमित शाह आणि तीन राज्यमंत्री नित्यानंद राय, अजयकुमार मिश्रा व निशित प्रामाणिक अशी गृहमंत्रालयातील सध्याची मंत्री रचना आहे. राज्यमंत्र्यांच्या कार्य वाटप आदेशात नित्यानंद राय यांना १५ खाती, तर अजयकुमार यांना ८ खाती देण्यात आली आहेत. गृहमंत्रालयात निशित प्रामाणिक यांचा दर्जा इतर दोन राज्यमंत्र्यांच्या बरोबरीचा नाही, हे कार्य वाटप आदेशातून स्पष्ट झाले आहे.
कार्यवाटपात कुणाकडे काय?निशिथ प्रामाणिक यांना मात्र केवळ तीन विभाग देण्यात आले आहेत. सीमा व्यवस्थापन विभाग-१ व विभाग-२ तसेच अधिकृत भाषा विभाग हे ते तीन विभाग होत; पण गंमत अशी की, यातील पहिले दोन विभाग नित्यानंद राय यांना आणि अधिकृत भाषा विभाग अजयकुमार मिश्रा यांना देण्यात आलेला आहे ! निशित प्रामाणिक यांना या तिन्ही विभागांच्या फायली नित्यानंद राय आणि अजयकुमार मिश्रा यांच्यामार्फत मिळतील, असे कार्य वाटप आदेशात म्हटले आहे. म्हणजेच या तिन्ही विभागांचा कार्यभार दोन-दोन राज्यमंत्र्यांकडे असेल.