नवी दिल्ली - ज्यांच्या हातात नापासची मार्कशीट आहे त्यांनी मेरिटच्या विद्यार्थ्याला अभ्यास कसा करावा हे तत्वज्ञान सांगण्यासारखे संजय राऊतांचे आरोप आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे सरकार होते त्यांनी काय दिवे लावले? २ वर्षात किती उद्योग आणले? उद्योगाबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. कोरोना काळात मंदिरे सुरू झाली नाहीत पण दारूची दुकाने सुरू ठेवली. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले नाहीत अशा शब्दात मंत्री सुधीर मुनगंटीवारांनीसंजय राऊतांचा समाचार घेतला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दुकाने उघडी पण मंदिरे बंद. मविआ सरकारमधील चुका दुरुस्त करण्याचं काम भाजपा-शिंदे सरकार करतेय. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारनं पूर्ण राज्यात आरोग्य व्यवस्थेत उत्तम काम केले असं म्हटलं नाही. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत नियोजन चांगले केले इतकेच सांगितले. ६० मार्काच्या भरवशावर मेरिट आणल्याचा वाव मागील सरकार करत होते. मायावी गोष्टी लोकांपर्यंत पोहचवणे हे तंत्र मविआकडे चांगले आहे असा टोला त्यांनी लगावला.
तसेच ज्यांच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत आहे त्यांना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे अधिकार आहेत. उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी ते इतर भावांचेही बाळासाहेब वडील होते. ते भाऊ एकनाथ शिंदेंसोबत आहेत. बाळासाहेब हे आमचे वडील आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात मग इतर भावांचेही ते म्हणणं आहे. ते भाऊ एकनाथ शिंदेंसोबत आहेत असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुंबईत येतायेत. मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे. मेट्रो, एम्ससारखे प्रकल्प दिलेत. १९ तारखेला जेव्हा मोदी मुंबईत येतील तेव्हा जनता उत्स्फुर्तपणे त्यांचं स्वागत करतील. मोदींच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.