नवी दिल्ली - देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येत आहे. कोरोनामुळे लोकांना गेली दोन वर्षे होळी साजरी करता आली नाही. पण यंदा सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर पाण्याचा अपव्यय टाळा असे संदेश फिरत आहेत. या मेसेजेसवर मध्य प्रदेशातील भाजपा नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग (Vishwas Sarang) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक देशातील तरुणांना सणांपासून दूर नेण्यासाठी सांस्कृतिक दहशतवाद पसरवत असल्याची जोरदार टीका सारंग यांनी केली आहे.
"फक्त हिंदूंच्या सणांमध्येच पर्यावरणाविषयी बोलून सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जात आहे. असे संदेश पसरवत देशातील तरुणांना हिंदू सणांपासून दूर नेण्याचा कट आहे" असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. तसेच "होळीला पाणी वाचवण्याचा संदेश देऊन काही होणार नाही. जे लोक होळीत पाणी वाचवण्याबद्दल बोलतात ते आपली गाडी चकाचक करण्यासाठी यापेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय करतात. त्यांनी आधी स्वत:मध्ये सुधारणा करायला हवी" असंही म्हटलं आहे. फक्त सणांच्या वेळीच अशा गोष्टी का समोर येतात?" अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
हे लोक पर्यावरणाच्या नावाखाली संस्कृतीवर हल्ला करत असल्याचा हल्लाबोलही केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच होळी 2022 साजरी करण्याआधी, मोदी सरकारने देशभरातील नागरिकांना त्यांच्या आईसह जेवणाचा आस्वाद घेऊन रंगांचा सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी #MaaKeSangKhana किंवा #MealWithMom वापरून त्यांच्या आईसह जेवणाचा आस्वाद घेतानाचे खास फोटो शेअर करावेत. यातील काही निवडक फोटो सरकार त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करेल.