लखनऊ: भाजपाविषयी दलित समाजात निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेत्यांना दलित वस्त्यांमध्ये जाऊन काही काळ व्यतीत करण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून दलित समाजाच्या मनातील भाजपाविषयीची अढी दूर होईल, असा मोदींचा उद्देश होता. मात्र, उत्तर प्रदेशातील एका आमदार महाशयांनी या आदेशापासून अशी काही पळवाट काढली की, अनेकजण थक्क झाले.
उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा हे सोमवारी रात्री रजनीश कुमार या दलित व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते. मात्र, याठिकाणी जाताना आमदार महाशय स्वत:बरोबर हॉटेलमधील जेवण आणि भांडी घेऊन गेले होते. यावरून आता राणा यांच्यावर टीका होत आहे. रजनीश यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, राणा आणि भाजपाचे नेते आपल्याला न कळवताच घरी येऊन धडकले. मला घरी थांबायला सांगितले होते, परंतु असे काही होईल, याची मला कल्पना नव्हती. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते. हे सर्व काही पूर्वनियोजित आणि एकप्रकारचा दिखावा होता, असे रजनीश यांनी सांगितले. मात्र, सुरेश राणा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी घराच्या हॉलमध्ये बसून रजनीश यांच्या घरात बनवलेले जेवण खाल्ले. परंतु, माझ्यासोबत तब्बल 100 कार्यकर्ते असल्याने आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधून काही पदार्थ मागविले होते, असे राणा यांनी सांगितले.