हरीष गुप्ता, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांनी या वर्षी दौऱ्यावर किती पैसा खर्च केला? अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पाच्या छापील प्रती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आल्या नाहीत, पण डिजिटल स्कॅनिंंगमधील जी माहिती समोर आली, त्यातून मोदी सरकारमधील मंत्र्यांनी २०१५-१६ मध्ये प्रवास दौऱ्यावर तब्बल ५६६ कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे.वास्तविक, २६९ कोटी रुपयांची यासाठी तरतूद करण्यात आली होती, पण आर्थिक वर्षात ५६६.६६ कोटी रुपये दौऱ्यावर खर्च झाला. पंतप्रधान मोदी यांची मंत्र्यांचे वेतन, भत्ते आणि पंतप्रधान कार्यालयाच्या खर्चावर या जवळपास दोन वर्षांच्या काळात कडक नजर असल्याचे सांगण्यात येते, पण या दौऱ्याच्या खर्चाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मोदी सरकारचे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचा (पीएमओ) वेतन आणि भत्ते व इतर खर्च या वर्षी ७०७.८३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी-२ (युपीए-२) ने आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या प्रवास खर्चावर १५०० कोटी रुपये खर्च केले होते. पंतप्रधान मोदी हे आपल्या मंत्र्यांचे विदेश दौरे आणि इतर खर्चाबाबत काहीसे कठोर आहेत व त्यांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली आहेत. सन २०१० मध्ये आर्थिक ओढाताण सुरू होताच, मंत्र्यांचा प्रथम श्रेणीचा विमान प्रवास बंद करण्यात आला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांनी विदेशात शिष्टमंडळे घेऊन जाण्यावर आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये परिषदांचे आयोजन बंद केले आहे. माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या व्हीव्हीआयपी विमानांची देखभाल आणि कॅबिनेट व राज्यमंत्री आणि माजी पंतप्रधान यांच्या प्रवास खर्चाचा बिलात समावेश आहे. पंतप्रधान बनल्यानंतर मोदी यांनी पहिल्या वर्षी व्यापक प्रवास केला. तो त्यांचे मंत्री आणि माजी पंतप्रधानांनी केलेल्या प्रवासाला मागे टाकणारा ठरला.
मंत्र्यांचा दौरा ५६६ कोटींचा
By admin | Published: March 01, 2016 3:27 AM