- हरीश गुप्ता ।नवी दिल्ली : राजधानीत उद्या मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल होणार असतानाच, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची मागणी केल्याने पक्षनेते व मंत्र्यांना धक्का बसला आहे. परराष्ट्र खाते सोडून संरक्षण मंत्रिपद स्वीकारण्यात मला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारावा, असा सल्ला स्वराज यांनी दिला आहे. आधी अनेक पंतप्रधानांनी परराष्ट्र खाते सांभाळले आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. पंतप्रधानांनी परराष्टÑ मंत्रालय आपल्याकडे ठेवल्यास या खात्याला तीन राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक हरदीप सिंग पुरी असतील.पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव संरक्षणमंत्रिपदासाठी असले तरी त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेलेनाही. मात्र त्यांच्यासह पीयूष गोयल आणि मनोज सिन्हा यांना पदोन्नती मिळेल. राजस्थानातील ज्येष्ठ नेते ओम माथूर यांचा समावेश निश्चित आहे. या नावांना अंतिम रूप देण्यात येत आहे. सुरेश प्रभू यांचे खाते तसेच विनय सहस्रबुद्धे यांचा समावेश यांवर अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे समजते.जेटली यांना ते खाते नकोचअरुण जेटली यांनी ४ सप्टेंबरपासून सुरु होणारा जपानचा चार दिवसांचा दौरा रद्द केला आहे. आपण संरक्षणमंत्रीपदावर राहू इच्छित नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.स्वत:चेच नाव केले पुढे?‘लोकमत’ला उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी स्वराज यांना जेव्हा विचारणा केली की, पुढील संरक्षणमंत्री कोण असावे? त्यावर सुषमा यांनी स्वत:चेच नाव पुढे केले, असे कळते.मोदी यांनी पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक बोलाविली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा दिल्लीत नसल्याने त्यांनी अरुण जेटली, राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांच्याशी व नंतर स्वराज यांच्याशी चर्चा केली.स्वराज यांच्या प्रस्तावावर विचार करण्यासमोदी यांनी सहकाºयांना सांगितले आहे.मात्र परिवहनमंत्री नितीन गडकरी हे नवे रेल्वे आणि विमान वाहतूकमंत्री असतील, हे स्पष्ट झाले आहे. एअर इंडियाच्या विक्रीनंतर विमान वाहतूक मंंत्रालयात काही उरणार नाही. त्यामुळे अशोक जी. राजू (टीडीपी) जे सध्या या मंत्रालयाचे प्रभारी आहेत, त्यांच्याकडे नव्या मंत्रालयाचा कार्यभार देण्यात येईल.शिवसेना, जदयू अनभिज्ञचमंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल याविषयी आपणास काहीही माहिती नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच जदयूचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील या दोन्ही पक्षांतर्फे उद्या कोणीही मंत्री होणार नाही, असे दिसत आहे. अण्णा द्रमुकने तर आम्हाला मंत्रिमंडळात सहभागी व्हायला वेळ लागेल, असे आधीच स्पष्ट केले आहे.केवळ भाजपाचेच मंत्रीमंत्रिमंडळात जदयू, शिवसेना वा अण्णा द्रमुकच्या कोणालाच उद्या सहभागी केले जाणार नाही आणि सारे नवे मंत्री भाजपाचे असतील, असे सांगण्यात येते.संभाव्य नवे चेहरे : हरदीप सिंग पुरी, गजेंद्र सिंग शेखावत, सत्यपाल सिंग, अल्फान्सो कन्ननाथानम, अश्विनीकुमार चौबे, शिवप्रताप शुक्ला, वीरेंद्रकुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग. हे सर्व राज्यमंत्री असतील. हरदीपसिंग पुरी व अल्फान्सो कन्ननाथानमहे खासदार नाहीत, ते माजी सनदी अधिकारी आहेत.पुरी हे युएनमध्ये परमनन्ट सेक्रेटरी होते.आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष के. हरिबाबू यांचा समावेश शक्य आहे. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्याने व बंडारू दत्तात्रय यांना मंत्रिपदावरून दूर केल्याने त्या राज्याला प्रतिनिधित्व गरजेचे होते.
सुषमा स्वराज यांना संरक्षण मंत्रालय? गडकरींकडे रेल्वे, विमान वाहतूक खाते; जेटलींचा जपान दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 3:39 AM