नवी दिल्ली : पासपोर्ट मिळवण्यासाठी ब-याच प्रक्रियेतून लोकांना जावे लागते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयालाच माहित नाही की, भारतात आतापर्यंत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. माहिती अधिकारात (आरटीआय) मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. एका व्यक्तीने परराष्ट्र मंत्रालयाकडे गेल्या वर्षांत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आला, यासंदर्भात माहिती मागितली होती.
आरटीआय कार्यकर्ता शैलेश गांधी यांनी यासंदर्भात ही माहिती मागितली होती. यामध्ये गेल्या पाच वर्षांत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आला. यातून मिळालेले उत्पन्न आणि यासाठी खासगी ठेदारांना किती रुपये देण्यात आले, अशी माहिती शैलेश गांधी यांनी मागितली होती. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, संबंधित माहिती विभागाकडून ठेवली जात नसल्याचे सांगितले.
यावेळी शैलेश गांधी म्हणाले, परराष्ट्र मंत्रालयाकडे यासंबंधी माहिती नाही म्हणजे ही एक धक्कादायक बाब आहे. देशात तयार करण्यात येणा-या प्रत्येक पासपोर्टची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविण्यात येते. याप्रकरणी लवकरात लवकर अपीलीय अधिका-यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.