नवी दिल्ली: केंद्रीय गृह मंत्रालयानेसीमा सुरक्षा दलाचे(BSF) अधिकार क्षेत्र वाढवलं आहे. आता बीएसएफ अधिकाऱ्यांना अटक, तपास आणि जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. बीएसएफ अधिकारी पश्चिम बंगाल, पंजाब आणि असाममध्ये अटक आणि तपास करण्यासाठी सक्षम असतील. बीएसएफला सीआरपीसी, पासपोर्ट कायदा आणि पासपोर्ट(भारत प्रवेश) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
राज्यात 50 किमीपर्यंत कारवाई करता येणार
असाम, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये बीएसएफला तपास आणि अटक करण्याचा अधिकार मिळाला आहे. बीएसएफ अधिकारी तीन राज्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान सीमेपासून 50 किमी आतपर्यंत कारवाई करू शकतील. यापूर्वी ही लिमीट 15 किलोमीटर होती. याशिवाय, बीएसएफ अधिकाऱ्यांना नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर आणि लडाखमध्ये तपास आणि अटक करण्याची परवानगी असेल.
गुजरातमधील अधिकारक्षेत्र कमी केलं
दरम्यान, या निर्णयासह गुजरातमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र कमी करण्यात आले असून सीमेची मर्यादा 80 किमीवरुन कमी करुन 50 किमी करण्यात आली आहे, तर राजस्थानमध्ये पूर्वीप्रमाणे 50 किमी ठेवण्यात आलं आहे. मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूर या पाच ईशान्य राज्यांसाठी आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी कोणतीही सीमा निश्चित केलेली नाही.