नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आला असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
याआधी राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र, यावेळी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला होता. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला होता. याच बरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले होते.
या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) कांग्रेस पक्षाकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच, याप्रकरणी भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आला असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावत आहेत. अमेठीमध्ये त्यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी आहे. अमेठीहून राहुल गांधी तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्याविरोधात असलेल्या भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमेठी मतदारसंघातून जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती ईराणींनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.