नवी दिल्ली-
देशातील वृत्त वाहिन्यांचे रेटिंग्ज तातडीनं जारी करण्याची सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलला (BARC) केली आहे. यासोबत खरा ट्रेंड सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी गेल्या दोन महिन्यांचा डेटा प्रकाशित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
नव्या आदेशानुसार बातम्या व रिपोर्टिंग चार आठवड्यांच्या रोलिंग अॅव्हरेज संकल्पनेवर आधारित असेल. "टीआरपी कमिटी रिपोर्ट आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) शिफारसीनुसार बीएआरसीनं त्यांची एकूण प्रक्रिया, प्रोटोकॉल, पर्यवेक्षण यंत्रणा आणि प्रशासकीय संरचनेत बदल सुरू केले आहेत. याशिवाय स्वतंत्र सदस्यांच्या समावेशासाठी बोर्ड आणि तांत्रिक समितीची पुनर्रचना देखील बीएआरसीद्वारे सुरू करण्यात आली आहे. एक कायमस्वरुपी समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. तसंच अॅक्सेस प्रोटोकॉलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा तसंच नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. बीएआरसीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी यंत्रणेत केलेल्या नव्या बदलांनुसार नव्या प्रोटोकॉल्सचे स्पष्टीकरण व माहिती देण्यासाठी ते संबंधित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. तसंच नव्या प्रोटोकॉलनुसार डेटा प्रकाशित करण्यास ते सज्ज आहेत", असं माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.