ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 20 - जलिकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर तामिळनाडूत सुरू झालेल्या तीव्र आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. तामिळनाडूत चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयाने तामिळनाडू सरकारने पाठवलेल्या जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे. हा अध्यादेश आता मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. आता येत्या काही दिवसांत जलिकट्टूबाबतचा अध्यादेश लागू होऊ शकतो.
तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'जलिकट्टू' या पारंपरिक खेळावर लादण्यात आलेल्या बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटले असून, या खेळावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांसून, सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच आवाज उठवला आहे.
पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली बंदी घातली होती. मात्र मोदी सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती. मात्र कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारला झटका दिला होता. ही बंदी उठविण्यासाठी तामिळनाडूतील स्थानिकांनी मोठे आंदोलन पुकारले असून, गेल्या आठवड्याभरापासून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. काहींनी कँडल मार्च काढला तर बुधवारी चेन्नई येथील मरीना बीच, मदुराई अशा अनेक भागात आंदोलने करण्यात आली.
सेलिब्रिटींनीही दर्शवला पाठिंबा
जगविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, अभिनेता रजनीकांत, कमल हासन, क्रिकेटपटू आर.अश्विन, विख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान या सर्वांनीच जलिकट्टूचं समर्थन केले आहे. जलीकट्टू हा खेळ तामिळनाडूचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, अशा शब्दांत विश्वनाथन आनंदने या खेळाच्या आयोजनाला पाठिंबा दिला. मी प्राण्यांच्या हक्कांचे समर्थन करतो पण येथे तो मुद्दा नाही. परंपरा आणि उदरनिर्वाहाच्या साधनाचाही मान राखला गेला पाहिजे', असेही आनंदने नमूद केले. तर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी जालिकट्टूच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.