रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांसाठी एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला जे काही मिळेल ते वापरून कीव्ह सोडण्यास सांगितले आहे.
कीव्हमध्ये रशियन सैनिक सोमवारी रात्रीपासून सतत बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया चांगलाच आक्रमक झाला आहे. सततच्या हल्ल्यांमुळे धोका वाढला आहे. त्यामुळेच भारतीय दूतावासाने घाईघाईत अॅडव्हायझरी जारी केली आहे. युक्रेनच्या पोलिसांनी काही भारतीयांवर केलेल्या हल्ल्याच्या वाढत्या धोक्यानंतर आणि हल्ल्याच्या घटनेनंतर रशियानेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये युक्रेनमध्ये जे भारतीय अडकले आहेत, त्यांनी रशियन सैनिकाशी संपर्क साधावा, असे म्हटले होते. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो २१ वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला.
मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. खारकीव्हच्या प्रशासनाने या आधीच सांगितलं होतं की, रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. त्यामध्ये नेमकं किती नुकसान झालं याची त्यांनी माहिती दिली नव्हती. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारात जवळपास ११ लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आज सकाळी रशियन सैन्यानं खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. रशियन सैन्यानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर धुळीचे लोट पसरले. इमारतीच्या शेजारी असलेली वाहनांचं या हल्ल्यात मोठं नुकसान झालं.
रशियाकडून व्हॅक्युम बॉम्बचा वापर
रशियानं युक्रेनविरोधातील युद्धात प्रतिबंधित केलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेननं केलाय. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओकसाना मार्कारोव्हा यांनी हा दावा केलाय. व्हॅक्युम बॉम्ब सह इतरही प्रतिबंधित शस्त्रांचा वापर रशिया करत असल्याचा युक्रेनमधील मानवी हक्क संघटनांचा आणि युक्रेन सैन्याचा दावा आहे. युक्रेनकडून असा दावा होत असला तरी याबाबत संयुक्त राष्ट्रसंघ किंवा इतर कोणाकडूनही अद्याप अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.