नवी दिल्ली : भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गृह मंत्रालयानेबांसुरी स्वराज यांची नवी दिल्ली नगरपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने अधिसूचनाही जारी केली आहे.
गुरुवारी (दि.४) बांसुरी स्वराज यांनी एनडीएमसी (NDMC) सदस्य म्हणून शपथ घेतली. यासंदर्भातील पोस्ट त्यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटद्वारे सोशल मीडियावर शेअर केली आहे. दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनीही एनडीएमसीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि अतिरिक्त पदभार स्वीकारला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून बांसुरी स्वराज निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत बांसुरी स्वराज यांच्याविरोधात आम आदमी पक्षाकडून सोमनाथ भारती यांनी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बांसुरी स्वराज यांनी तब्बल ७८,३७० मतांनी विजय मिळविला.
कोण आहेत बांसुरी स्वराज?बांसुरी स्वराज या माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बांसुरी स्वराज देखील राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. बांसुरी स्वराज यांना आधी भाजपकडून कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत बांसुरी स्वराज यांनी विजय मिळवला.
याचबरोबर, बांसुरी स्वराज या वकील आहे. त्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. इंग्रजी साहित्यात त्यांनी बीए ऑनर्ससह पदवी घेतल्यानंतर लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तसेच, बांसुरी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर्स केले आहे.