नवी दिल्ली: दसरा आणि दिवाळी या काळात सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्यांची खूप गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली सहा महिने किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने स्टेशनवर मास्क घालण्याबाबत विशेष गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्या अधिसूचनेची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपणार होती. पण, आता दसरा-दिवळीसारख्या सणांना होणाऱ्या गर्दीमुळे 17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत रेल्वेने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, गाइडलाइन्स 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 22 हजार रुग्णांची वाढ
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात सुमारे 22 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 56 टक्के कोविड प्रकरणे केरळमधून नोंदवण्यात आली होती. अद्यापही अशी 5 राज्ये आहेत जिथे अजूनही 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये सुमारे 1,22,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात जवळपास 36,000 आहेत. तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे.