ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या दिल्लीतील 'निर्भया' बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीला आणखी एक वर्ष एका स्वयंसेवी संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याने सध्या तरी त्याची सुटका लांबणीवर पडली आहे.
१६ डिसेंबर २०१२ साली राजधानी दिल्लीत वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणा-या तरूणीवर सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये पाशवी अत्याचार केले होते, त्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या नराधमांपैकी एक जण गुन्ह्याच्यावेवी अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती व त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. या महिनअखेरीस सुटका होणार होती, मात्र बालसुधारगृहात त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्यामुळे त्याला आणखी एक वर्ष स्वयंसेवी संस्थत देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्याच्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
दिल्ली हायकोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील अल्पवयीन दोषीसोबत त्याचे जवळचे संबंध निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बालसुधारगृहात निर्भया प्रकरणातील दोषीचं ब्रेनवॉश करुन दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी तयार केल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान निर्भया बलात्कार प्रकरणातील इतर चार आरोपींना मृत्यूदंड ठोठावण्यात आला असून पाचव्या आरोपीने तुरूंगातत गलफास लाऊन आत्महत्या केली.