ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० -निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची सुधारगृहातून सुटका होऊ नये यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी शनिवारी मध्यरात्री अखेरच्या क्षणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने मालिवाल यांची याचिका दाखल करुन घेतली असली तरी, दोषीच्या सुटकेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे अल्पवयीन दोषीची आज सुटका होणार आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव या अल्पवयीन गुन्हेगाराला दिल्लीतील बालसृधारगृहात अज्ञातस्थळी नेण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल आपल्या वकीलांसह शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विशेष विनंती याचिका दाखल करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गेल्या. त्यानंतर तेथून त्या सुप्रीम कोर्टात रजिस्ट्रारना भेटण्यासाठी गेल्या. यासंदर्भात आपल्याला सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी व स्वाक्षरी करण्यासाठी रजिस्ट्रारनी बोलावले आहे, असे स्वाती मालीवाल यांनी सांगितले. त्यानंतर रात्री सव्वा एकच्या सुमारास त्या सुप्रीम कोर्टाबाहेर आल्या आणि सुप्रीम कोर्टाने याचिका मंजूर केली असून यावर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
तसेच, रजिस्ट्रार सर्व कागदपत्रे घेऊन न्यायाधीशांकडे गेले आहेत, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी व्हॅकेशन बेंचचे न्यायाधीश ए. के. गोयल आणि न्यायाधीश यू. यू. ललित यांची नियुक्ती केली. यानंतर स्वाती मालीवाल न्यायाधीश ए.के. गोयल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्यांनी या याचिकेवरील सुनावणी सोमवारी (दि.२१) होणार असल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होईपर्यंत त्या दोषीची सुटका करण्यात येऊ नये, अशी मागणी पोलीस आणि सरकारकडे स्वाती मालीवाल यांनी केली आहे.