"एकदा त्या मुलीला तर भेटायला अयोध्येत जा, जिच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्याने..."; आचार्य प्रमोद कृष्णम भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:12 PM2024-08-02T16:12:19+5:302024-08-02T16:13:33+5:30
राहुल गाधी आणि अखिलेश यादन यांच्यावर भडकताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "धर्मनिरपेक्षतेच्या “योद्ध्यांनो” तुम्ही राम मंदिरात तर जाणार नाही, पण..."
काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम अयोध्येतील बलात्कार प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर भडकले आहेत. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत त्यांनी, अयोध्येतील एका 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे, किमान त्या पीडित मुलीला भेटण्यासाठी तरी अयोध्येत जा, असा सल्ला राहुल गांधी आणि अखिलेश यादन यांना दिला आहे.
"सेक्युलरिज्म मौन आहे, हा मोईन खान कोण आहे?" -
राहुल गाधी आणि अखिलेश यादन यांच्यावर भडकताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "धर्मनिरपेक्षतेच्या “योद्ध्यांनो” तुम्ही राम मंदिरात तर जाणार नाही, पण तुमच्या पक्षाच्या नेत्याने सामूहिक बलात्कार केलेल्या 12 वर्षांच्या मुलीला भेटण्यासाठी तर एकदा अयोध्येला जा." प्रमोद कृष्णम यांनी आपली ही पोस्ट राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनाही टॅग केली आहे. आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी, "सेक्युलरिज्म “मौन” है, ये मोईन ख़ान “कौन” है?" असा प्रश्नही विचारला आहे.
सपा नेत्यावर बलात्काराचा आरोप -
समाजवादी पक्षाचा नेता मोईन खानवर 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची पुष्टी केली. यानंतर पीडितेने आई-वडिलांना संपूर्ण प्रकरण सांगितले. अल्पवयीन मुलगी ही निषाद कुटुंबातील आहे. आरोपी सपा नेता एका बेकरीचा मालक आहे. बेकरीमध्ये नोकरीचे अमिष दाखवत त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
व्हिडिओ तयार करून... -
आरोपीने पीडितेवरील बलात्काराचा व्हिडिओ तयार करून तिला, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तो तिच्यावर दोन महिने बलात्कार करत होता. ही घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक समाजवादी पक्षाचा भदरसा नगराध्यक्ष आहे.