ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीच्या बालसुधारगृहातून सुटकेला स्थगिती देण्यास शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या २० डिसेंबरला या दोषीची सुधारगृहातून सुटका होऊ शकते.
आम्हाला मान्य आहे हा, गंभीर विषय आहे. पण कायद्यानुसार गुन्हेगाराला आणखी सुधारगृहात ठेवता येणार नाही असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. या अल्पवयीन दोषीच्या पुनर्वसनासाठी ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने आरोपीशी, त्याच्या पालकाशी आणि केंद्र सरकारशी चर्चा करावी असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. हा गुन्हेगार सुटणे समाज हिताचे नसल्याचे स्वामी यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून ज्योति सिंह या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यात हा दोषीसुध्दा होता. गुन्हा केला तेव्हा त्याच्या वयाची १८ वर्ष पूर्ण नव्हती म्हणून अल्पवयीन गुन्हेगारांसाठी असणा-या कायद्याखाली त्याच्या विरोधात खटला चालवला.
संपूर्ण देशात विशेषकरुन दिल्लीमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. संसदेत यावरुन तत्कालिन सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते तसेच दिल्लीतील जनताही रस्त्यावर उतरली होती.