नवी दिल्ली-
वय वर्ष १४ असूनही नोकरी करणं म्हणजे बालकामगार कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यातही एखाद्यानं आपल्या कामाच्या ठिकाणी बालकामगार ठेवणं गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जातो. दिल्लीत झोमॅटो कंपनीसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तो त्याच्या वडिलांच्या जागी फूड डिलिव्हरीचं काम करत होता. तो नेमकं असा का करत होता यामागची कहाणी खूप रोमांचक आहे.
त्याचं झालं असं की रोहिणीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं झोमॅटोवर फूड ऑर्डर दिली. जेवण आल्यावर डिलिव्हरी बॉय अल्पवयीन असल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. १४ वर्षीय मुलाचा व्हिडीओ बनवून त्यांनी सोशल मीडिया शेअर केला. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. अल्पावधीतच सुमारे २ लाख व्ह्यूज मिळाले.
आता या डिलिव्हरी बॉयची कहाणी एकदा जाणून घेऊयात. हा मुलगा दिल्लीतील समयपूर बदली येथील रहिवासी आहे. कुटुंबात आई-वडिलांशिवाय ३ बहिणी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. कारखान्यात काम करण्यासोबतच त्याचे वडील 'झोमॅटो'मध्ये सायकलवरून फूड डिलिव्हरीचं कामही करायचे. आई घरकाम करते. दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात वडिलांच्या गुडघ्याला दुखापत झाली. आता त्याला जास्त वेळ उभं राहता येत नसल्यानं कारखान्यात ६ तास शिफ्ट करुन पुन्हा डिलिव्हरी बॉयचं काम करणं शक्य होत नाही. कारखान्याला दिवसाच्या ६ तास कामासाठी त्यांना २०० रुपये मिळत होते. त्यामुळे आधीच गरीब कुटुंबाचं जगणं कठीण झालं होतं.
वडिलांसोबत झालेल्या अपघातानंतर, अल्पवयीन मुलानं स्वत: त्यांच्या जागी 'झोमॅटो'साठी फूड डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली. दुपारी ३ वाजेपर्यंत शाळेत शिकत असे. घरी आल्यानंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो स्वतः अभ्यास करायचा. त्यानंतर तो सायकल घेऊन फूड डिलिव्हरीसाठी बाहेर पडायचा. एक दिवशी तो रोहिणी येथे फूड डिलिव्हरीसाठी गेला असता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हायरल झालेल्या या अल्पवयीन डिलिव्हरी बॉयच्या वडिलांनी संपूर्ण कहाणी सांगितली. "फॅक्टरीमध्ये काम करून मी महिन्याला १३ हजार रुपये कमवत होतो. मात्र कोरोना महामारीमुळे कारखाना बंद पडला होता. मग मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागलो. सोबत आणखी एका कारखान्यात कामही केले. पण गुडघ्याच्या दुखापतीनंतर, मी फक्त कारखान्यात काम करू शकतो जिथं मला दररोज ६ तास कामासाठी २०० रुपये मिळतात. माझ्या मुलानं काम करायला सुरुवात करावी असं मला वाटत नव्हतं पण त्यानं स्वतःच्या इच्छेनं आम्हाला पाठिंबा देण्याचं ठरवलं"
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, मुलाची ओळख उघड झाल्यानं अल्पवयीन कुटुंब चिंतेत आहे. मुलाच्या आईनं सांगितलं की, 'मी घरकाम करते. मी माझ्या मुलाला सांगितलं की आम्ही काही करुन सांभाळून घेऊ, पण तू काम करू नकोस. पण लहानपणापासूनच तो नेहमीच एक जबाबदार मुलगा आहे"
ज्या व्यक्तीनं मुलाचा व्हिडिओ शूट केला तो व्यक्तीही आता अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यानं पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाची भेट घेऊन त्याला प्रोत्साहन दिलं.
हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर 'झोमॅटो'च्याही निदर्शनास आलं. कंपनीनं झोमॅटो फ्युचर फाऊंडेशनच्या माध्यमातून अल्पवयीन मुलाच्या शिक्षणासाठी मदत देऊ केली आहे. Zomato ने एका निवेदनात म्हटले आहे की, “हे आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही सोशल मीडियाचे आभारी आहोत. या प्रकरणात अनेक नियमांचं उल्लंघन होत आहे. बालमजुरीचा विषय आहे आणि दुसऱ्याच्या जागी काम करण्याचा विषय आहे. याबाबत आम्ही कुटुंबीयांना जाणीव करून दिली आहे. कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही कोणतेही कठोर पाऊल उचललेलं नाही"
तसंच अल्पवयीन मुलाच्या शिक्षणासाठी झोमॅटो फ्युचर फाऊंडेशनच्यावतीनं मदत करण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. माणुसकीच्या धर्माला जागत आम्ही शक्य तितकी मदत कुटुंबाला केली असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.