चेन्नई - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना तामिळमधील प्रसिद्ध आणि काँग्रेस नेते नेल्लई कन्नन यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. अल्पसंख्याकांनी मोदी आणि अमित शाह यांची हत्या केली पाहिजे, असे विधान कन्नन यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित सभेत केले होते. दरम्यान, या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर नेल्लई कन्नन यांना अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी रविवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कन्नन म्हणाले होते की, ''अल्पसंख्याकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची हत्या केली पाहिजे. कुणीतरी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची हत्या करेल, असे मला वाटले होते. मात्र तसे कुणी केले नाही.'' सध्या गृहमंत्री अमित शाह ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नियंत्रित करत आहेत, असा आरोपही कन्नन यांनी केला होता. कन्नन यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच कन्नन यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपाने तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी कारवाई करत कन्नन यांना बुधवारी अटक केली. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 504, 505 आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ''काँग्रेस नेते नेल्लई कन्नन यांनी आपल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची हत्या करण्यासाठी मुस्लिमांन भडकवले आहे. यासंदर्भात मी तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे, असे भाजपा नेते एच. राजा यांनी म्हटले आहे.