ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ - बलात्काराचे आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांना सज्ञान आरोपीप्रमाणेच कायदा लागू करावा अशी मागणी महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे. गांधी म्हणाल्या की बलात्कार करणा-या अल्पवयीन मुलांपैकी १६ वर्षांच्या ५० टक्के मुलांना माहित असतं की बालगुन्हेगारांना गंभीर शिक्षा होत नाहीत, त्यामुळे ते असे गुन्हे करण्यास धजावतात. त्यामुळे योजनाबद्ध खून किंवा बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये अशा अल्पवयीन मुलांना सज्ञान आरोपींप्रमाणे शिक्षा केली तर त्यांना जरब बसेल व अशा गुन्ह्यांमध्ये घट होईल असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या नेत्या ममता शर्मा यांनीही या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली असून व्यापक चर्चेनंतर या संदर्भातले बदल कायद्यात करायला हवेत असे त्या म्हणाल्या.
मात्र, मानवाधिकाराच्या दृष्टीकोनातून काही अशासकीय संस्थांचा या प्रस्तावाला विरोध असून सरकार या प्रश्नी काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीही युपीए सरकारमधील मंत्री कृष्णा तीरथ यांनी गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या १६ वर्षांवरील मुलांना सज्ञान व्यक्तीप्रमाणे कायदा लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.