नवी दिल्ली - टोकियो भारताला पहिल्याच दिवशी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दिलं. रौप्य पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती. मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक झालं, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. आता, त्याच मुख्यमंत्र्यांना मीराबाईने खाकी वर्दीतून सॅल्यूट केला आहे.
माळरानावर लाकडं गोळा करुन डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचं सेलिब्रेशन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीराबाईचं कौतुक करत अभिनंदन केलं होतं. विशेष म्हणजे मणीपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करत तिला विशेष सरकारी पोस्टही देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, मीराबाईला आता प्रभारी पोलीस अधिक्षकपदाची नोकरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी मीराबाईने सॅल्यूट केलेला फोटो शेअर केला आहे. तसेच, आपल्या देशाचा अभिमान, ऑलिंपिक पदक विजेता मीराबाई चानू यांनी प्रभारी पोलीस अधीक्षकपदाची कार्यभार स्विकारला. त्यानंतर, मला माझ्या कार्यालयात येऊन भेट दिली, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. सध्या, मीराबाई आणि बिरेनसिंग यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.