ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा आयुष्यात काहीवेळा प्रत्यय येतो. काही जणांची आयुष्याची दोरी इतकी बळकट असते की, एखाद्या भीषण आपत्तीतूनही ते बचावतात. त्यांचे वाचणे इतरांसाठी एक चमत्कार असतो. सीआरपीएफचे कमांडंट चेतन कुमार चिता यांचे शुद्धीवर येणे चमत्कारापेक्षा कमी नाही असे खुद्द डॉक्टरांचे मत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना चेतन कुमार यांना तब्बल नऊ गोळया लागल्या होत्या.
एखाद-दुसरी गोळीही माणसाचा प्राण जाण्यासाठी पुरेशी असते. पण नऊ गोळया झेलूनही चेतन कुमार यांचा आयुष्यासाठी संघर्ष सुरु होता. त्यात ते यशस्वी ठरले आहेत. महिन्यांभरापासून कोमामध्ये असलेले चेतन कुमार शुद्धीवर आले असून बोलू लागले आहेत. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणारे चेतन कुमार चिता आता डिस्चार्जसाठी फीट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चेतन कुमार यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या ड़ोक्यामध्ये गोळी घुसली होती. सांध्यामध्ये फ्रॅक्चर होते. उजव्या डोळयालाही मार लागला होता. डोक्याला कितपत मार लागला आहे ते तपासण्यासाठी चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा स्कोर एम 3 होता. ते कोमामध्ये होते. आता त्यांचा स्कोर एम 6 असून, ते शुद्धीवर आहेत. त्यांचे सर्व अवयवही व्यवस्थित आहेत.
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यामध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत चिता जखमी झाले होते. या चकमकीत तीन जवान शहीद झाले तर, एक दहशतवादी मारला गेला. चिता यांना आज डिस्चार्ज मिळू शकतो. चिता यांचे बचावणे चमत्कारापेक्षा कमी नाही असे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. चेतन कुमार चिता यांच्यावर सर्वप्रथम श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर चिता यांची नाजूक स्थिती लक्षात घेऊन त्यांना हवाई रुग्णवाहिकेव्दारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आणण्यात आले.
एम्समध्ये दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांच्या वेगवेगळया टीम्सनी त्यांच्यावर उपचार केले. चेतन कुमारांनी त्यांच्या आयुष्यात फिटनेसला नेहमीच महत्व दिले आहे. त्यांचा फिटनेस आणि तीव्र इच्छाशक्ती यामुळे ते इतक्या गंभीर आजारावर मात करु शकले अशी प्रतिक्रिया त्यांची पत्नी उमा सिंह यांनी दिली.