दिल्लीच्या एम्समध्ये एका महिलेने बेशुद्ध अवस्थेत एका मुलीला जन्म दिला आहे. ही घटना वैद्यकीय क्षेत्रासाठी चमत्काराहून कमी नाहीय. २३ वर्षीय महिला गेल्या सात महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहे. असे असले तरी तिच्या कुटुंबीयांनी इच्छाशक्ती, डॉक्टरांचीी मेहनत यामुळे सृदृढ मुलगी जन्माला आली आहे.
बुलंदशहरच्या महिलेचा पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. यावेळी तिच्या डोक्याला मार लागला होता. तेव्हापासून ती बेशुद्ध होती. अपघातावेळी ती दीड महिन्याची गर्भवती होती. ३१ मार्चला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पती पत्नीने हेल्मेट घातले नसल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ती वाचली परंतू, डोळे उघडझाप करण्याखेरीज ती शरीराची हालचाल करू शकत नव्हती.
आजही ती कोणत्याही सूचनेचे पालन करू शकत नाहीय. तिने हेल्मेट घातले असते तर आज तिचे आयुष्य काही वेगळेच असले असते, असे एम्सच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. महिलेचा पती ड्रायव्हर म्हणून कामाला होता. मात्र, त्याने गर्भवती पत्नीची देखभाल करण्यासाठी नोकरी सोडली आहे. डॉक्टरांनी ती प्रेग्नंट असल्याचे समजताच गर्भ ठेवायचा की नाही याचा निर्णय सर्वस्वी तिच्या कुटुंबीयांवर सोडला होता. यासाठी त्यांना कोर्टात जावे लागणार होते. कुटुंबीयांनी गर्भपात न करण्याचे ठरविले.
मुलीचा जन्म झाल्यावर पतीने आपल्याकडे सांगण्यासारखे काही नाहीय, असे म्हटले. आता पुढे काय करायचे याबाबत काहीच माहिती नाहीय. पुढचे आयुष्य कसे जाईल हे देखील माहिती नाहीय. सर्व काही ठप्प झाल्यासारखे वाटत आहे. अपघातावेळी मी तिच्यासोबतच होतो, परंतू तिला एकटीलाच भोगावे लागत असल्याचे तो म्हणाला.