वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:04 PM2024-08-02T12:04:52+5:302024-08-02T12:05:07+5:30

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत.

Miracle in Wayanad! Four people were found alive on the fourth day of the landslide, so far 308 dead | वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू

वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू

केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलैच्या पहाटे भला मोठा डोंगर चार गावांवर कोसळला होता. या घटनेला आज चार दिवस होत आलेत. तो चिखल, पाणी आणि दरड पाहून आता कोणी जिवंत सापडेल अशी आशा वाटत नव्हती. रेस्क्यू ऑपरेशन तरीही सुरुच होते. बघता बघता मृतदेहांच्या आकड्याने ३०० चा आकडा पार केला. अद्यापही अनेक लोक या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत किंवा पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले आहेत. असे असताना एक चमत्कार घडला आहे. 

वायनाडमध्ये बचाव कार्य करत असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला मातीच्या ढिगाऱ्याखालून चार जण जिवंत सापडले आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूष आहेत. लँडस्लाईडनंतर ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. पदावेट्टी कुन्नू गावातून त्यांना वाचविण्यात आले आहे. यामुळे रेस्क्यू टीमच्या आशा पल्लवीत झाल्या असून आणखी काही जण जिवंत सापडतील या आशेने कामाचा वेग वाढविण्यात येत आहे. 

आतापर्यंत ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १९५ जणांचेच मृतदेह सापडले असून उर्वरित व्यक्तींचा शरीराचा कोणता ना कोणता भाग सापडला आहे. या १०५ लोकांच्या शरीराचा काही भाग रेस्क्यू टीमला सापडला आहे. यावरून त्यांचा मृत्यू झाल्याचे ठरविण्यात आले आहे. 

भारतीय सैन्य, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफसह ४० टीम या रेस्क्यू ऑपरेशनसाठी काम करत आहेत. हा भाग मोठा असल्याने सहा भागात त्याची वाटणी केली जाणार आहे. जेणेकरून ज्या भागात आतापर्यंत पोहोचता आले नाही, तिथे लवकर मदत मिळाली तर आणखी काही लोक जिवंत सापडू शकतील अशी आशा आहे. तसेच हिंडन एअरबेसवरून सी-130 विमानातून ड्रोनद्वारे मातीखाली गाडले गेलेल्या लोकांना शोधण्यात येणार आहे. याचीही तयारी हिंडनमध्ये सुरु झाली आहे. 

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत. यामुळे या भागात हेलिकॉप्टरही सर्च ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आली आहेत. वन विभागाचे कर्मचारीही बोलावण्यात आले आहेत. 

Web Title: Miracle in Wayanad! Four people were found alive on the fourth day of the landslide, so far 308 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.