विरोधकांचे गैरवर्तन, नायडूंच्या डोळ्यांत अश्रू; संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 03:24 PM2021-08-12T15:24:17+5:302021-08-12T15:24:35+5:30
नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती.
हरिश गुप्ता -
नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी केलेल्या गैरवर्तन व गदारोळाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी नायडू खूप भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळून ते काही सेकंद बोलू शकले नाहीत. राज्यसभेतील सदस्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे अस्वस्थ होऊन मी रात्रभर झोपू शकलो नाही असेही ते म्हणाले. विरोधकांच्या गदारोळाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार होते.
नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती. मात्र त्याऐवजी कृषीविषयक समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यास मंगळवारी संमती देण्यात आली. या निर्णयाचा निषेध करताना काही विरोधी सदस्य राज्यसभेत जिथे पत्रकार, अधिकारी बसतात, त्या टेबलांवर चढून घोषणा देऊ लागले. एका खासदाराने कामकाजातील एक फाईल सभापतींच्या दिशेने भिरकावली होती. राज्यसभेचे बुधवारी कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सभापतींचे आसन व त्याजवळील भाग हा एक प्रकारे राज्यसभेचा गाभारा आहे. त्यासहित सर्व सभागृहाचे पावित्र्य खासदारांनी कायम राखले पाहिजे.
अपेक्षेइतके काम नाही
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत जितके काम होणे अपेक्षित होते तितके होताना दिसत नाही. या अधिवेशनात काळात आतापर्यंत या सभागृहाचे फक्त २२ तासच काम झाले आहे. विरोधकांच्या गदारोळाचे कारण देऊन लोकसभेचे कामकाज ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केले.