नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्र यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली तर तेथील सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची गुजरातचे राज्यपाल म्हणून बदली केली.गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली सोमवारी निवृत्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही राज्यपाल ज्या दिवशी पदभार स्वीकारतील तेव्हापासून या नेमणुका प्रभावी मानल्या जातील, असे राष्ट्रपती भवनातून काढलेल्या एका निवेदनात नमूद केले गेले. कलराज मिश्र भाजपचे उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ नेते असून, वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर दोन वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा मोदी सरकारमधून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आता झालेली लोकसभा निवडणूकही लढविली नव्हती. आचार्य देवव्रत यांची २०१५ मध्ये पाच वर्षांसाठी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली होती. आता ते उर्वरित काळ गुजरातचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.
मिश्रा हिमाचलचे, देवव्रत गुजरातचे राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:10 IST