सुरेश भटेवरा, नवी दिल्ली‘जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक काम करतो आणि दुसरा त्याचे श्रेय घेतो यापैकी पहिल्या प्रकारची व्यक्ती बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, कारण त्यात सर्वात कमी स्पर्धक असतात.’ दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या या विधानांचा दाखला देत, पंतप्रधान मोदींनी बुधवारी राज्यसभेत काहीशा मिस्कील शैलीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुलची विकेट घेतली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना ईपीएफवरील करप्रस्ताव सरकारने मागे घेतल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर पंतप्रधानांचे हे भाष्य होते.राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींचा आवेश लोकसभेसारखा आक्रमक नव्हता. मात्र, काँग्रेसची खिल्ली उडवण्याची एकही संधी त्यांनी बुधवारी सोडली नाही. आपल्या भाषणात काँग्रेसवर मिस्कील वार करताना दिवंगत शायर निदा फाजलींच्या शायरीच्या खालील ओळी मोदींनी उद्धृत केल्या.सफर में धूप तो होगी...जो चल सको तो चलो...सभी है भीड में... तुम भी निकल सको तो चलो...किसी के वास्ते राहें कहां बदलती है... तुम अपने आप को खुदही बदल सको तो चलो....यहां किसि को कोई रास्ता नही देता...मुझे गिराकर अगर तुम संभल सकते हो... तो चलो...जवळपास तासभराच्या भाषणाची अत्यंत संयत स्वरात सुरूवात करीत यंदाच्या अधिवेशनात गोंधळाविना चांगले कामकाज झाल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांसह सर्वांचे सुरूवातीलाच आभार मानले. निश्चित धोरणांचा पाठपुरावा करीत सरकारने कामकाज कशाप्रकारे चालवले आहे, याचे अनेक दाखले पंतप्रधानांनी दिले.