सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दोन वर्षांपूर्वीच्या बलात्कारातील एका प्रकरणावर मौन सोडले आहे. यावेळी त्यांनी न्यायाधीशांची नियुक्ती, कॉलेजियम वाद, न्यायालयांवर सरकारचा दबावाच्या आरोपांवर खुलासे केले आहेत. तसेच त्यांनी हार्ले डेव्हिडसनसोबतच्या फोटोवरही भाष्य केले आहे.
इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये बोबडे आले होते. यावेळी त्यांनी एका बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला. २०२१ मध्ये बोबडे यांनी बलात्कारातील आरोपीला पीडितेशी लग्न करणार का, असे विचारले होते. यावरून मोठा वाद झाला होता. एवढेच नाही तर बोबडेंनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. यावर बोबडे यांनी आपली बाजू मांडली आहे.
तरुण आणि तरुणी खूप काळापासून प्रेमसंबंधांत होते. परंतू, दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे कुटुंबीयांनी तोडगा काढत त्यांना लग्न करण्यास सांगितले होते. म्हणून दोघांनी एक अॅग्रिमेंट करत लग्न करणार असल्याचे म्हटले होते. परंतू त्यांचे लग्न झाले नव्हते. यामुळे तरुणीने तरुणाला जर लग्न केले नाहीस तर मी बलात्काराचा आरोप लावेन अशी धमकी दिली होती. त्यामुळे तरुणाने याचिका दाखल केली होती. त्यावर मी त्याला तू तरुणीशी लग्न करणार आहेस की नाही, असा सवाल केला होता. जर लग्न करणार नसशील तर मी तुझी याचिका फेटाळेन असे म्हटले होते. परंतू, हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याची खंत बोबडे यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात बोबडे नागपुरमधून सर्वोच्च न्यायालयाचे काम हाताळत होते. यावेळी मॉर्निंग वॉकवेळी हार्ले डेव्हिडसनवर बसलेला फोटो खूप व्हायरल झाला होता. यावर बोबडे यांनी ती बाईक माझी नव्हती. मी तिच्यावर फक्त बसलो होते. ती मी चालवली देखील नाही. कोणीतरी ती बाईक आणली होती, मी कुतुहलाने बसलेलो असताना कोणीतरी त्याचे फोटो काढले आणि व्हायरल केले. पण मला आयुष्यात कधीतरी हार्ले डेव्हिडसन चालवायला नक्कीच आवडेल, अशी इच्छाही बोबडे यांनी व्यक्त केली.