नवी दिल्ली : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. यावरुन माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
आडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलबंन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे, असे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत आहेत आणि त्याकडे निवडणूक आयोग कानाडोळा करताना दिसत आहे. कायदा सर्वांना लागून होतो, मग पंतप्रधान असो वा सामान्य नागरिक. जर हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी कारवाई केली नसती तर निवडणूक आयोग आणि पंतप्रधानमंत्री यांच्यावर होणारी टीका थांबली असती. मात्र, असे झाले नाही, दोघांवरही टीका होत आहे, असे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी सांगितले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीचे उदाहरण देताना डॉ. एस.वाय. कुरैशी म्हणाले, "नवीन पटनायक यांच्या डोळ्यासमोर निवडणूक आयोगाच्या टीमने हेलिकॉप्टरची तपासणी केली. मात्र, नवीन पटनायक यांनी याविरोधात कोणतीही प्रतिक्रिया देण्याऐवजी याचा सन्मान केला. ते खरे राजनेता आहेत आणि आम्हाला अशा राजनेत्यांची गरज आहे."
दरम्यान, ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती. मोहम्मद मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे पालन केले नाही. यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे, असे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले होते.
मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांचे निलंबन झाल्याचे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.
मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला?नरेंद्र मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून कथितरीत्या एक काळा बॉक्स नेण्यात आला होता. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली. त्यांनी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,'' आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक गुढ बॉक्स बाहेर काढण्यात आला. तसेच धाईगडबडीत इनोव्हामध्ये टाकून नेण्यात आला. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन या बॉक्समध्ये काय होते आणि इनोव्हा कुणाची होती. याची चौकशी केली पाहिजे.''