रामेश्वरम : शिलाँगमध्ये सोमवारी आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेलेल्या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना येथे गुरुवारी हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या साक्षीने लष्करी इतमामात दफनविधी सुरू असताना ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. तेथे लोटलेल्या जनसागराच्या मनात या लोकोत्तर लोकनायकाला निरोप देताना ज्या भावना दाटून आल्या होत्या, त्याचीच अनुभूती त्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीच्या छोट्या पडद्यावर घरबसल्या पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांनी घेतली. जुन्या घरातून निघाली अंत्ययात्रा डॉ. कलाम यांचा जन्म आणि बालपण ज्या ठिकाणी गेले त्या पल्लीवसल स्ट्रीट येथील जुन्या घरी त्यांचे पार्थिव बुधवारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणाहून फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनातून कब्रस्तानाकडे नेले जात असता तीन कि.मी. मार्गावर लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. त्यांना अखेरचे बघता यावे यासाठी विशेषत: शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.कौटुंबिक मशिदीत विशेष नमाज अदा करण्यात आल्यानंतर डॉ. कलाम यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव दीड एकर परिसरात पसरलेल्या पेईकारुम्बू येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव खास उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर ठेवण्यात आले तेव्हा लष्कराने २१ बंदुकीच्या फैरींनी सलामी दिली, हजारो मुखातून बाहेर पडलेल्या डॉ. कलाम अमर रहे, भारत माता की जय या नाऱ्यांनी वातावरण भारावून गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र ठेवून सॅल्यूट केला. स्तब्ध उभे राहून त्यांनी आदरांजली अर्पण केली.पुन्हा जन्माला या !रामेश्वरमच्या लोकांनी डॉ. कलाम यांचा पुनर्जन्म व्हावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. अलविदा कलामजी, तुमचा पुनर्जन्म व्हावा, अशी लोकांची इच्छा आहे. ‘जब तक सूरज चांद रहेगा, आपका नाम याद रहेगा’ असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे.- पार्थिवाच्या जवळ बसलेले डॉ. कलाम यांचे थोरले बंधू ९९ वर्षीय मोहम्मद मुथू मीरान लेबाई मराईक्कर यांच्याजवळ जात मोदींनी त्यांचे सांत्वन केले. राहुल गांधी यांनीही आदरांजली अर्पण केली. विदेशी प्रतिनिधींसह विविध पक्षांच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू, तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, कर्नाटक, केरळ, आंध्रचे मुख्यमंत्री तसेच तामिळनाडूचे अर्थमंत्री ओ. पन्नीरसेल्व्हम उपस्थित होते. तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी माजी सर्वोच्च कमांडरला मानवंदना दिली.
‘मिसाईल मॅन’ अनंतात
By admin | Published: July 31, 2015 2:59 AM