बालासोर : भारताने इस्रायलसोबत संयुक्तरीत्या विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची गुरुवारी प्रायोगिक स्तरावर यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील संरक्षण स्थळी ही चाचणी घेण्यात आली.मध्यम पल्ल्याचे हे क्षेपणास्त्र (एमआर-एसएएम) भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त उपक्रमाची निर्मिती आहे. चांदीपूरच्या इंट्रिगेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) येथून सकाळी ८.१५ वाजता एका मोबाईल लाँचरच्या मदतीने हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्याने दिली.‘ही प्रायोगिक चाचणी यशस्वी राहिली आणि क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य अचूक टिपले. क्षेपणास्त्राला आयटीआरच्या लाँचपॅड-३ वर ठेवण्यात आले होते. रडारद्वारे सिग्नल प्राप्त होताच क्षेपणास्त्र सक्रिय झाले आणि त्याने बंगालच्या उपसागरावर ‘बांशी’ या मानवरहित विमानाच्या साहाय्याने सोडण्यात आलेले लक्ष्य भेदले,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.अशाप्रकारचे लांब आणि मध्यम पल्ल्ल्यांचे किमान शंभर क्षेपणास्त्र येत्या वर्षभरात मेसर्स भारत डायनामिक लिमिटेडला पुरविण्याचा हैदराबाद येथील भारतीय संरक्षणसंशोधन विकास प्रयोगशाळेचा विचार आहे. (वृत्तसंस्था)>संभाव्य धोका टळलाक्षेपणास्त्र आणि त्याचा मार्ग ओळखून त्याचे दिशादर्शन करता येईल यासाठी या संपूर्ण प्रणालीत बहू क्रियाशील निरीक्षण आणि धोक्याची सूचना देणारे रडार (एमएफ-एसटीएआर) बसविण्यात आले आहे. एमएफ-एसटीएआरच्या मदतीने हे क्षेपणास्त्र आकाशातून येणारा कोणताही संभाव्य धोका निष्प्रभ करण्यास सक्षम राहील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी!
By admin | Published: July 01, 2016 5:22 AM