नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सरकारी १0, जनपथ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या स्पेशल कमांडो ग्रुप (एसपीजी) मधील कमांडो गायब झाल्याने, तुघलक रोड पोलीस त्याचा शोध घेत असतानाच, तो अचानक प्रकट झाला. तो कुठे व कधी सापडला, हे लगेच सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.कमांडो राकेश कुमार हा १ सप्टेंबर रोजी गणवेश घालून १0 जनपथवर पोहोचला, पण त्या दिवशी त्याची ड्युटी लावण्यात आली नव्हती. ड्युटी नसताना, तो गणवेशातून का घराबाहेर पडून, १0 जनपथवर का आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही त्याची चौकशी करीत आहोत, असे दिल्लीच्या उपायुक्तांनी सांगितले.राकेशकुमार आपल्या कुटुंबासोबत द्वारका सेक्टर-८ मध्ये एका भाड्याच्या घरात राहतो. त्याच्यासोबत पत्नी, मुलगा, मुलगी आणि कुटुंबातील अन्य सदस्य राहतात. राकेशच्या वडिलांनीच पोलिसात तक्रार दाखल केली होती.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेशकुमार घरातून १ सप्टेंबरच्या सकाळी गणवेश घालून निघाला. तो १0, जनपथलावरही पोहोचला. तिथे आपल्या सहकाºयांना भेटून तो ११ वाजण्याच्या सुमारास तेथून निघाला. निघताना त्याने आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर सोबत घेतली नाही व आपला मोबाइलही तिथेच ठेवला. त्यामुळे मोबाइल फोनच्या साह्याने राकेशचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.राकेशकुमार २ सप्टेंरबर रोजी घरी गेला नाही, तेव्हा त्याला डबल ड्युटी करावी लागली असेल वा तो मित्रांकडे गेला असेल, असे घरच्या मंडळींना वाटले, पण त्याचा फोन लागत नव्हता. तो ३ सप्टेंबर रोजीही घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांनी १0, जनपथवर जाऊन चौकशी केली असता, तो १ सप्टेंबरपासून कामावर आलाच नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मधल्या काळात तो कामावर गेला नव्हता. त्याबद्दल एसपीजीने वरिष्ठांना का कळविले नाही, याचीही चौकशी होणार आहे.गृहमंत्रालयाने दिल्या होत्या शोधाच्या सूचना-माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच हत्या केली होती. त्यांचे पुत्र व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही सुरक्षा यंत्रणा भेदून, तामिळ टायगर्सनी हत्या केली होती.तेव्हापासून गांधी कुुटुंबातील सर्वांना एसपीजीची सुरक्षा आहे. त्या ग्रुपमधील एक कमांडो अचानक बेपत्ता झाल्याने, गृहमंत्रालयाने त्याच्या शोधाच्या सूचना दिल्या होत्या.
सोनिया गांधी यांच्या सुरक्षेतील बेपत्ता कमांडो पाच दिवसांनी सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:08 AM