अहमदाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल कुठे आहेत, याचा शोध घ्यावा असे आदेश मंगळवारी अर्ध्या रात्री गुजरात उच्च न्यायालयाने दिल्याच्या काही तासानंतर रहस्यमय स्थितीत बेपत्ता झालेले हार्दिक बुधवारी दुपारी अचानक समोर आले. आपले अपहरण झाले होते, असा दावा त्यांनी यानंतर केला.हार्दिक पटेल ‘बेपत्ता’ आहेत, असा दावा पोलिसांनी केला असतानाच आपले अपहरण झाले होते, असा दावा हार्दिक यांनी पत्रकारांसमक्ष केला. राज्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या धरांगधारा गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर ते रहस्यमय स्थितीत समोर आले. काही लोकांनी आपले अपहरण करून आपल्याला रात्रभर बंदी बनवून ठेवले होते, असा दावा त्यांनी यावेळी केला.खुद्द हार्दिक यांनीच पत्रकारांशी बोलताना या नाट्यमय घडामोडीची माहिती दिली. अरावली जिल्ह्यातील बयाडनजीक माझ्या गाडीचा पाठलाग केला गेला आणि काही अंतरावर मला गाठून काही लोक मला त्यांच्यासोबत घेऊ गेले. त्यांनी मला रात्रभर कारमध्ये बसवून ठेवले. आंदोलन संपवा नाही तर तुम्हालाच संपवण्यात येईल, अशी धमकी त्यांच्यापैकी एका व्यक्तीने मला दिली. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर होते. ही पहिली व अखेरची धमकी असल्याचे तो मला म्हणाला. संपूर्ण रात्र धमक्या दिल्यानंतर मला सुरेंद्रनगरच्या धरांगधारा तालुक्यातील एका गावात सोडून दिले गेले, असा दावा हार्दिक यांनी केला. यापूर्वी हार्दिक पटेल गुंगारा देऊन पळून गेल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मंगळवारी अरावली जिल्ह्यात विनापरवानगी कथितरीत्या सभा आयोजित केल्याबद्दल ताब्यात घेण्यासाठी पोलीस पोहोचले असता पटेल तेथून अचानक निघून गेले, असे पोलिसांनी म्हटले होते.मध्यरात्री सुनावणीहार्दिक पटेल यांना पोलिसांनी बेकायदा अटक केली असून त्यांच्या जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या एका याचिकाकर्त्याच्या याचिकेवरील सुनावणीसाठी मंगळवारी रात्री गुजरात उच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्यात आले. (वृत्तसंस्था)
‘बेपत्ता’ हार्दिक पटेल अचानक अवतरले
By admin | Published: September 23, 2015 10:29 PM