लाहोर- बैसाखी उत्सावासाठी पाकिस्तानात गेलेला व तेथून बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय भारतीय शीख तरूणाचा पत्ता सापडला आहे. लाहोरपासून जवळपास 50 किलोमीटर लांब शेखूपुरामधील त्याच्या फेसबुक फ्रेण्डच्या घरी तो सापडला आहे. इवेक्वी ट्रस्ट प्रॉपर्टी (इटीपी) बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
अमृतसरमध्ये राहणारा अमरजीत सिंह बैसाखी साजरी करण्यासाठी 12 एप्रिल रोजी 1700 शीख लोकांसह पाकिस्तानमध्ये गेला होता. 1700 जणांचा जत्था जेव्हा भारतात परत यायला निघाला तेव्हा अमरजीत बेपत्ता असल्याचं समजलं. दरम्यान, अमरजीत कुठे आहे, याबद्दल माहिती मिळाली असून त्याला मंगळवारी भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं जाईल, असं इटीपीबीचे प्रवक्ते आमिर हाशमी यांनी सांगितलं.
अमरजीत शेखूपुरामध्ये त्याचा मित्र आमिर रज्जाकला भेटण्यासाठी जत्थ्यापासून वेगळा झाला होता. रज्जाकच्या कुटुंबीयांनी बोर्डाला संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. सोमवारी रज्जाक व अमरजीत दोघेही बोर्डाच्या ऑफिसमध्ये पोहचले होते. व अमरजीत बेपत्ता झाला नव्हता याबद्दलची माहिती त्यांनी बोर्डाला दिली.