गुमशुदा की तलाश... रेल्वे स्टेशनवर झळकले अभिनेता सनी देओलचे पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:54 PM2021-06-03T15:54:08+5:302021-06-03T15:55:38+5:30
युवक काँग्रेसचे सरचिटणीस वरुण कोहली यांच्या नेतृत्वात रेल्वे स्टेनश परिसरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तसेच, सनी देओल यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
अमृतसर - कोरोना संकटात पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. तर, दुसरीकडे कोरोना परिस्थितवरुन राजकीय नेत्यांवरही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पठाणकोटमध्ये युवक काँग्रेसने खासदार सनी देओल यांचे पोस्टर चिकटवले आहेत. बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसरात हे पोस्टर चिकटविण्यात आले आहेत. तसेच, 'गुमशुदा की तलाश' अशी उपहासात्मक टीकाही करण्यात आली आहे.
युवक काँग्रेसचे सरचिटणीस वरुण कोहली यांच्या नेतृत्वात रेल्वे स्टेनश परिसरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तसेच, सनी देओल यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटात देशावर विदारक परिस्थिती ओढवली आहे. याचा फटका सनी देओल यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गुरुदासपूर आणि पठाणकोट यांनाही बसला आहे. मात्र, येथील खासदारांना काहीही देणंघेणं नाही. खासदार सनी देओल मुंबईत व्यस्त आहेत. कोरोना संकटकाळात लोकांमध्ये राहणे गरजेचं असतानाही, सनी देओल मुंबईत असल्याची टीका युवक काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, पठाणकोट येथील सनी देओलच्या कार्यालयाचे प्रभारी पंकज जोशी यांनी खासदारांची बाजू मांडली आहे. कोरोना काळात सनी देओल यांनी लाखो मास्क, सॅनिटायजर आणि पीपीई कीट मतदारसंघातील जनतेसाठी पाठवून दिले. तसेच, पठाणकोट, गुरदासपुर आणि बटाला येथील नागरिकांसाठी तीन आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त लैस एडवांस लाइफ सपोर्ट (एएलएस) अँम्ब्युलन्स पाठविल्या आहेत, असेही जोशी यांनी सांगितलं.