Congress CWC: या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नवी टीम तयार केली आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात एकूण 39 जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रमख असून, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 39 नेत्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच सचिन पायलट, शशी थरूर, आनंद शर्मा, अशोक चव्हाण आणि चरणजीत सिंह चन्नी यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, प्रियांका गांधी वाड्रा, एके अँटनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंग, पी चिदंबरम आणि इतर काही वरिष्ठ नेते देखील CWC मध्ये सामील आहेत. काँग्रेस कार्यकारिणीत 32 स्थायी निमंत्रित आणि 9 विशेष निमंत्रितांचा समावेश आहे.
अनेक दिवसांपासून CWC ची प्रतीक्षा होती. काँग्रेसमधील ही सर्वात मोठे निर्णय घेणारी समिती आहे. मात्र, या नव्या समितीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. यादी जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून बैठकांचा फेरा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या आणि त्यानंतर आज ही कमिटी जाहीर झाली.