लोकसभा निवडणूक तोंडांवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांना संबोधित करत मोठी घोषणा करणार असल्याचं वृत्त धडकल्याने उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओचं मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याची घोषणा केली. तसेत DRDO च्या शास्त्रज्ञांचं ट्विटच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. हे मिशन दिव्यास्त्र म्हणजे एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह स्वदेशीर रूपात विकसित केलेल्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी होती. ती यशस्वी झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मोठी घोषणा करणार होते ती हीच होती. तसेच आता पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रासह स्वदेशी रूपात विकसित अग्नी -५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी, मिशन दिव्यास्त्र यशस्वी करून दाखवल्याबद्दल मला DRDO च्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.
मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याने आता एकाच क्षेपणास्त्राला विविध ठिकाणी अनेक युद्ध आघाड्यांवर तैनात करता याणार आहे. तसेच ही चाचणी यशस्वी झाल्याने भारत आता एमआयआरव्ही तंत्रज्ञान बाळगणाऱ्या काही मोजक्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.