LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजप विविध पक्षांना राष्ट्रीय लोकशाही(NDA) मध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी एनडीएच्या उमेदवारांना भाजपच्या कठोर निवड प्रक्रियेतून आणि निकषांमधून जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणतीही जोखीम पत्करायची नाही, त्यामुळे यावेळेस लोकसभा मतदारसंघनिहाय अभिप्राय घेऊन उमेदवार शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जाणारआहे.
25 वर्षांपूर्वी एनडीएची युती झाल्यापासून भाजपने आपल्या मित्रपक्षांना उमेदवार निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून ते नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत 2014 आणि 2019 मध्ये एनडीएतील घटक पक्षांनी त्या-त्या जागांबाबत भाजपशीच चर्चा केली आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवार निवडले. अनेक ठिकाणी याचा उलट परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी प्रत्येक जागा भाजपसाठी महत्त्वाची असल्याने भाजप स्वतः त्या उमेदवाराची चाचपणी करणार आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आपल्या घटक पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे मागवणार असून विजयाच्या शक्यतेनुसार निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशातील सर्व 543 जागांवर भाजपचे सर्वेक्षण आणि फीडबॅकचे काम सातत्याने सुरू आहे. ज्या जागेवर मित्रपक्षाचे उमेदवार असतील, तिथे त्याची योग्यता, निवडून येण्याची शक्यता, अशा सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत.
जागा वाटपावरुन मित्रपक्षांमध्ये वाद झाला, तर भाजप तो वाद सोडवण्यात मदत करेल आणि अंतिम निर्णय भाजपचा असेल. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आपल्या सर्व मित्रपक्षांना जागा देण्याची गरज नसल्याचेही म्हटले आहे. ज्या मित्रपक्षांचा राज्यांमध्ये प्रभाव आहे आणि जे विजयी समीकरणात बसतील त्यांनाच भाजप जागा देईल आणि उर्वरित मित्रपक्षांना राज्यांच्या निवडणुकीत जागा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचे समाधान करेल.