नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा फटका शिवसेना-भाजपा युतीला बसला. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाला त्यामुळे राज्यात भाजपाला सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रासारखं राज्य भाजपाच्या हातून निसटलं. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता आणली. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही भाजपाची चूक होती अशी कबुली भाजपाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिली आहे.
न्यूज १८ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले की, शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र होतो. शिवसेनेला दूर करणे योग्य झालं नाही. जुन्या मित्रपक्षाला टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. शिवसेनेने आमची साथ सोडली असं त्यांनी बोलून दाखविले.
सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात. मागील आठवड्यात त्यांनी घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन भाजपा सरकारला घरचा आहेर दिला होता. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते.
'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. भाजपा खासदारानं पक्षालाचा इशारा देत सांगितलं होतं की, देशातली आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्याचा फटका भाजपाला दिल्ली आणि झारखंडच्या निवडणुकीत बसणार आहे. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भाजपाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते अशी टीका त्यांनी केली होती.